माननीय प्राचार्या,
अभिनव विद्यालय.
आज माझ्या आईच्या (सौ.प्रतिमा काकडे) सेवानिवृत्तीदिनी माझ्या काही भावना व्यक्त करण्याचा एक प्रयत्न म्हणून हे पत्र.
खरंतर आई अन मुलाचं नातं इतकं अनौपचारिक असतं की त्यातल्या एकाने दुसऱ्याबद्दल औपचारिक काही बोलणं तसं अवघडच असतं आणि ते कृत्रीम भासण्याचीच शक्यता असते. आज मला विलक्षण आनंद होतोय की या आईचा मी मुलगा आहे आणि तितकाच आनंद मला याचा देखील होतोय की प्रतिमा टिचरचा मी पाहिला विद्यार्थी आहे.
मला असं वाटतं की जितके नशीबवान आम्ही आहोत, मी आणि सनत, की आम्हाला एक हाडाची मास्तरीण आई म्हणून लाभली, तितकीच नशीबवान ही मुलं आहेत की त्यांना एक उत्तम आई मास्तरीण म्हणून लाभली आणि हा वसा तिला आमच्या आजोबाकडून, तिच्या वडिलांकडून, लाभलेला आहे.
मला प्रामाणिकपणे असं वाटतं की शिक्षक - विद्यार्थ्यांचं नातं हे केवळ शिकणारा आणि शिकवणारा असं मुळीच नसतं. शिक्षण हे, ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे ये हृदयीचे ते हृदयी घातले, असंच असावं लागतं. जेव्हा हृदयाचा हृदयाशी धागा जुळतो तेव्हाच तिथे उत्तम विचारांची देवाण घेवाण होण्याची आणि ते विचार मनात रुजून त्यातून संस्कार होण्याची शक्यता निर्माण होते. तसे वातावरण तयार करणे ही शिक्षकांची जबाबदारी असते.
मला असं वाटतं की अभिनवच्या सहवासात आई हे वातावरण या मुलांकरिता तयार करू शकली त्यामुळेच तिच्याशी या मुलांचं चांगलं नातं जुळलं.
बालवाडीतून पहिलीत येणारं मूल हे शिक्षिकेत आपल्या आईला शोधत असतं, त्यासाठी तो comfort zone असतो. कदाचित अशीच आई काही मुलांना माझ्या आईत भेटलेली असेल.
मुळात प्रेमळ स्वभाव, जोडीला शिकवण्याकरिता घेतलेली मेहेनत, पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन मुलांना काहीतरी द्यायची असलेली धडपड या सगळ्याचा परिपाक म्हणजे तिला मिळालेलं विद्यार्थ्यांचं,पालकांचं आणि आपणासर्वांचं प्रेम, असं मला वाटतं.
अभिनवने आईला तिच्यातील उपजत गोष्टींना पैलू पाडायची संधी दिली. अनेक प्रयोग करायला, उपक्रम करायला वाव दिला. चाळीशी पंचेचाळिशी नंतर एखाद्या Professional संस्थेत नोकरी सुरू करून तिथे स्थिरावणे हे निश्चितच challenging होते, पण आई अनेक गोष्टी शिकत गेली आणि स्वतःला घडवत गेली.
आईला ही संधी दिल्याबद्दल अभिनवचे मनःपूर्वक आभार. अभिनवच्या माध्यमातून आईला आणि पर्यायाने आम्हाला विविध क्षेत्रातील अनेक माणसांचा जो खजिना मिळाला आहे ती शिदोरी आयुष्यभर आम्ही अभिमानाने जपून ठेवू.
आदर्शच्या सर्व सदस्यांना, अभिनवच्या सर्व शिक्षकांना आणि सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याकरिता हार्दिक शुभेच्छा.
कळावे,
हिमांशु काकडे, पुणे.
२८-०४-२०१८
No comments:
Post a Comment