Wednesday, June 11, 2014

आरुष

आरुष,
सरत्या वर्षाला निरोप देत
नव्या वर्षाला कवेत घेत
तू जन्म घेतलास.

आरुष,
आरुष म्हणजे पहिला सूर्यकिरण.
अंधाराचे साम्राज्य नष्ट करणारा,
निजलेल्यांना जागृत करणारा,
दु:खाला सुखाची नवी उमेद देणारा,
कळीला फुलाचे वेध लावणारा.

आरुष,
आरुष म्हणजे उर्जेचा एक कण,
प्रकाशाबरोबर अग्निलाही जपणारा,
रानात पडला तर वणवा पेटवणारा,
कुंडात पडला तर यज्ञ भडकवणारा.

आरुष,
आयुष्याला दिशाहीन वणवा नाही,
तर ध्येयपूर्ण यज्ञ बनव.
या यज्ञात आई-वडिलांच्या त्यागाची समिधा असेल,
वडिलधाऱ्यांच्या संस्काराचे पंचामृत असेल,
गुरुजनांच्या शिकवणुकीचे तीर्थ असेल,
आणि शुभं करोतीचा मंत्र असेल.

काही काळाने हा यज्ञ सिद्धीरुपास येईल,
आणि त्या यज्ञीय ज्वालेतून
एक खंबीर, ध्येयनिष्ठ, सुसंस्कृत आणि ज्ञानी व्यक्तिमत्व निर्माण होईल.

त्या व्यक्तिमत्वाची ओळख असेल आरुष आशुतोष भुतकर
*****************************************************************************************
{माझ्या मेहुण्याच्या (आशुतोष भुतकर) मुलाच्या बारशाच्या प्रसंगी लिहिलेले.}

No comments:

Post a Comment