Wednesday, June 11, 2014

ध्येय

ध्येय काय असावे, ते कसे ठरवावे, कुणी ठरवावे, कधी ठरवावे आणि त्याहून महत्वाचे म्हणजे का ठरवावे हा विचार माझ्या मनात नेहमीच येतो.
   बऱ्याच वेळा मी ऐकतो की माणूस हा सुद्धा इतर प्राण्यांसारखाच एक प्राणी आहे ज्याची जगण्याची सर्वात महत्वाची गरज ही 'Survival' आहे. ह्या 'Survival' साठी माणसाच्या काही मूलभूत गरजा आहेत - अन्न, वस्त्र, निवारा. इतकेच जर आपण इतर प्राणीमात्रांसाराखेच आहोत तर मग त्यांना कुठे असते ध्येय, त्यांना कुठे काही मिळवायची मनिषा असते?
   मानवाला इतर प्राण्यांपासून वेगळे करणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मानवाची 'विचार करण्याची क्षमता'. एखाद्या गोष्टीचा सारासार विचार करणे, त्यावर इतरांचे मत तपासणे, त्या गोष्टीच्या भविष्यकालीन परिणामाबद्दल अंदाज बांधणे अन मग एखादी कृती करणे ही प्रक्रिया हे मानवाला मिळालेले वरदानच आहे.

image

आई

आई कशी आहे?
आई साधी आहे, सामान्य आहे
पिझ्झा पास्ता पेक्षा वरणफळं prefer करणारी आहे
नवरा येईपर्यंत जेवायची थांबणारी आहे.
***
आई तडजोड करणारी आहे, त्यागी आहे
मुलांच्या जडणघडणीसाठी स्वत:च्या आवडीनिवडींना बाजूला सारणारी आहे.
***
आई नाती जोडणारी आहे
अनोळखी गर्दीतून बाहेर पडताना चार जिवाभावाची माणसं जोडणारी आहे.
क्षुल्लक कारणांनी नाती तुटू नयेत, म्हणून तडफडणारी आहे.
***
आई खंबीर आहे
परिस्थितीचा आणि परिणामांचा विचार करून निर्णय घेणारी आहे.
आलेल्या संकटांना धाडसानं सामोरं जाणारी आहे.
अश्रूंना बाजूला सारून, मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याला खंबीर आधार देणारी आहे.
***
आई अपयश सहन करायला शिकवणारी आहे.
कुठे पडलो यापेक्षा कुठे घसरलो याचा विचार करायला लावणारी आहे.
***
आई आता बदलू लागलीये.
TV वरच्या "कुंकू" पायी तव्यावरची पोळी करपू लागलीये.
"Scooty Pep पेक्षा Access किती महाग आहे रे?" असके प्रश्नं आजकाल ऐकू येऊ लागलेत.
***
आमच्या कॉम्पुटर ला पण एक नवा user मिळालाय. 
***
पंचेचाळीशी नंतर नोकरी करू लागलेली आई 
आता professional झालीये.
शाळेतील कोणत्या गोष्टींचा किती विचार करायचा हे तिला बरोबर कळत.
***
एक खरंय,
आई आता थकू लागलीये,
पाठ, मणका, पाय, पोट आलटून पालटून 
तिला तिने आजवर केलेल्या कष्टाची जाणीव करून देत असतात.
***
आमच्यासाठी तिनं खूप केलंय,
आता तिच्यासाठी आम्हाला काहीतरी करायची इच्छा आहे.
पन्नाशी नंतरचं आयुष्य बोनस असतं असं ती म्हणते,
मग हा बोनस तिनं enjoy करावा असं वाटतंय.
***
हिरा कितीही चमकला तरी 
पैलू पडणाऱ्याचे ऋण तो कसा विसरेल?
भविष्यात कितीही मोठे झालो
तरी तुझे आजन्म ऋणाईत, हिमांशु आणि सनत.

मैत्रीण

नेहमी एक विचार यायचा मनात,

आपली पण एखादी मैत्रीण असावी, 
कधी हट्ट करणारी, कधी रुसून बसणारी,
कधी प्रेमळ, कधी एकदम स्पष्ट
कधी अगदी शांत तर कधी मन मोकळ्या गप्पा मारणारी 
पण असावी 'हक्काची'.

मजा यावी,
तिच्याशी बोलायला,
तिला छेडायला,
तिला रुसवायला,
नंतर समजूत घालायला.
चेहऱ्यावर चेष्टा असेल, 
मनात मात्र आदर असेल.
तिच्याबद्दल.

एक मैत्रीण असावी,
स्पष्ट, कठोर पण तितकीच प्रेमळ
ओरडायला लागली की मान खाली जावी, 
नजरेला नजर मिळवायला पण भीती वाटावी.

अशीच एखादी मैत्रीण असावी,
माणूस म्हणून चांगली असणारी

मला पण एक चांगला मित्र बनायची संधी देणारी.

लोक काय म्हणतील?

"लोग मेरे बारे मे क्या सोचते है, अगर ये भी मै ही सोचू, तो फिर लोग क्या सोचेंगे."

कुठेतरी फ्रेम करून कायमचा लावावा असा विचार वाटतोय मला हा. 
हा काय म्हणेल.. तो काय म्हणेल.. ह्याला काय वाटेल त्याला काय वाटेल...
फाट्यावर मारावेत हे असले विचार. 
स्वत:च्या सद्सद्विवेकबुद्धीला जे पटेल ते ध्येय निश्चित करावे आणि त्याच्या दिशेने धावायलाच सुरुवात करावी. 
एकदा का लय गवसली की मग ना पायाला लागणारे खडे जाणवतात.. ना आजुबाजुची कुजबुज ऐकू येते.. ना परिणामांची चिंता जाणवते.. 
प्रत्येक श्वासागणिक जाणवतो तो फक्त आपण आपल्या ध्येयासाठी सर्वस्व देतोय या गोष्टीचा आनंद.
असा आनंद अनुभवणारे लोक नशीबवानच म्हणावे लागतील.

माझी गरीब काव्यप्रतिभा

चार बुधले भरूनि आणितो मादक मदिरेचे 
प्राशन त्याचे अहर्निश हे कार्य नेहमीचे।
ना फिकीर कुणाची मला, अन भय ना कुणाचे 
ना कुणा जाहले धैर्य मजला रोखायचे।।धृ।।

- श्री श्री 'मधु'कर शास्त्री.

Reference : Char Bottle Vodka

माझे विचार.

रोजच्या जीवनात आपण अनेक गोष्टी शिकत असतो, कळत नकळत,  अनेक अनुभव येतात, वेगवेगळ्या गोष्टी वाचनात, पाहण्यात वा ऐकण्यात येतात. ह्या गोष्टी नकळतपणे आपल्या मनावर काहीतरी परिणाम करत असतात.
आपली विचारप्रक्रिया आपल्याला आलेल्या अनुभवातून घडत असते. आपली सद्सद्विवेकबुद्धी समृद्ध होत जाते ती ह्याच विचारप्रक्रियेतून. हीच सद्सद्विवेकबुद्धी आपल्या हातून घडत जाणाऱ्या प्रत्येक कृतीच्या, आपण घेत असलेल्या प्रत्येक निर्णयाच्या मुळाशी असते, असावयास हवी.
माझ्या प्रत्येक कृतीच्या मुळाशी असणाऱ्या विवेकबुद्धीला खतपाणी घालणारे असेच माझे काही विचार.

आरुष

आरुष,
सरत्या वर्षाला निरोप देत
नव्या वर्षाला कवेत घेत
तू जन्म घेतलास.

आरुष,
आरुष म्हणजे पहिला सूर्यकिरण.
अंधाराचे साम्राज्य नष्ट करणारा,
निजलेल्यांना जागृत करणारा,
दु:खाला सुखाची नवी उमेद देणारा,
कळीला फुलाचे वेध लावणारा.

आरुष,
आरुष म्हणजे उर्जेचा एक कण,
प्रकाशाबरोबर अग्निलाही जपणारा,
रानात पडला तर वणवा पेटवणारा,
कुंडात पडला तर यज्ञ भडकवणारा.

आरुष,
आयुष्याला दिशाहीन वणवा नाही,
तर ध्येयपूर्ण यज्ञ बनव.
या यज्ञात आई-वडिलांच्या त्यागाची समिधा असेल,
वडिलधाऱ्यांच्या संस्काराचे पंचामृत असेल,
गुरुजनांच्या शिकवणुकीचे तीर्थ असेल,
आणि शुभं करोतीचा मंत्र असेल.

काही काळाने हा यज्ञ सिद्धीरुपास येईल,
आणि त्या यज्ञीय ज्वालेतून
एक खंबीर, ध्येयनिष्ठ, सुसंस्कृत आणि ज्ञानी व्यक्तिमत्व निर्माण होईल.

त्या व्यक्तिमत्वाची ओळख असेल आरुष आशुतोष भुतकर. 
*****************************************************************************************
{माझ्या मेहुण्याच्या (आशुतोष भुतकर) मुलाच्या बारशाच्या प्रसंगी लिहिलेले.}